
अहमदनगर- बनावट सोने तारण कर्ज प्रकरणाची व्याप्ती वाढल्याने या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडून केला जाणार आहे. सदर गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
कोतवाली पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून शहर सहकारी बँक व संत नागेबाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटी मधील बनावट सोनेतारण प्रकरणाचा तपास सुरू आहे. शहर बँकेत आत्तापर्यंत ८९३३ ग्रॅम म्हणजे सुमारे नऊ किलो बनावट दागिने आढळून आले आहेत. या प्रकरणी ३७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल असून, ३.२२ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. अद्यापही काही कर्जदारांची खाती तपासण्याचे काम सुरू आहे. तर संत नागेबाबा मल्टीस्टेट सोसायटीमध्ये ८५६४ ग्रॅम म्हणजे सुमारे साडेआठ किलो बनावट दागिने आढळून आले आहेत. या गुन्ह्यात 53 आरोपींचा समावेश असून आत्तापर्यंतच्या तपासणीत २.८८ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.
नागेबाबा मल्टीस्टेट मधील संशयित खात्यांपैकी केवळ ५० ते ६० टक्केच खात्याची तपासणी झाली, अद्याप मोठ्या प्रमाणात खात्यांची तपासणी बाकी आहे.
या दोन्ही गुन्ह्यात मिळून सुमारे ६ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे आतापर्यंतसमोर आले आहे. त्यामुळे या गुन्ह्याचा तपास आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेत नव्याने रुजू झालेले पोलिस निरीक्षक देशमुख यांच्यामार्फत हा तपास केला जाणार असल्याचे अधीक्षक पाटील यांनी सांगितले.