
अहमदनगर- श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील स्टील व सिमेंट विक्रीचा व्यावसाय करणार्याची ऑनलाईन सहा लाखांची फसवणूक झाली आहे. स्टील देतो, असे सांगून विश्वास संपादन केला आणि सहा लाख रूपये बँक खात्यावर घेतले. स्टील न देता फसवणूक केली.
याबाबत सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. अमित मिश्रा गोयल नामक व्यक्तीविरूध्द फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी यांना 4 ऑक्टोबर व 5 ऑक्टोबर रोजी एका मोबाईल नंबरवरून फोन आला. समोरच्या व्यक्तीने स्टील प्रायव्हेट लिमिटेड, रायपुर येथून सेल्समन अमित मिश्रा गोयल बोलतो, असे सांगितले. स्टील देतो असे सांगून एका व्हॉट्सअप नंबरवरून फिर्यादीला खोटी कागदपत्रे पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला.
स्टील खरेदीसाठी फिर्यादी यांनी त्या व्यक्तीच्या बँक खात्यावर सहा लाख रूपये पाठविले. दरम्यान त्या व्यक्तीने फिर्यादी यांना स्टील दिले नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे फिर्यादीच्या लक्ष्यात येताच त्यांनी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.