
अहमदनगर- लष्कराचे बनावट एनओसी बनविल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अटक केलेला राजेंद्रसिंग देशराजसिंग उर्फ राजा ठाकूर याने सैन्यदलात सफाई कामगाराची नोकरी लावण्याच्या अमिषाने एकाची 11 लाखाची फसवणूक केली आहे.
याबाबत विक्रम विजय छजलाने (वय 39, रा.हरी मळा, सोलापूर रोड, भिंगार) यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात ठाकूरविरूध्द फिर्याद दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
ठाकूर हा सैन्य दलाच्या ए.सी.रेकॉर्डस् विभागात कंत्राटी स्वरूपात काम करत असताना त्याने हा प्रकार केला आहे. राजा ठाकूर याने छजलाने यांना तुमच्या पत्नीस भारतीय सैन्यदलात सफाई कामगार म्हणून नोकरीला लावतो, अशी बजावणी केली. तसेच माझी पत्नी ब्रिगेडीयर यांची स्विय सहाय्यक असल्याने त्या अनुषंगाने माझे सैन्यदलात उच्च अधिकारी परिचित आहेत. आतापर्यंत मी अनेक लोकांची नोकरीची कामे करून दिलेली आहेत. तुमच्या पत्नीला नोकरीला लावण्यासाठी अधिकार्यांना पैसे द्यावे लागतील असे सांगितले.
त्यामुळे छजलाने ते नोकरी करत असलेल्या संस्थेच्या कर्मचारी सोसायटी मधून जमा रक्कम तसेच नातेवाईक, मित्र मंडळे यांच्याकडून जुळवाजुळव करून सहा लाख रूपये रोख स्वरूपात सन 2018 मध्ये दिले. उर्वरित पाच लाख रूपये देण्यासाठी फिर्यादी छजलाने यांनी पतसंस्थेत दागिने गहाण ठेवून सोनेतारण कर्ज घेतले. या कर्जाची रक्कम भिंगार अर्बन बँकेच्या खात्यात वर्ग झाल्यानंतर फिर्यादी छजलाने यांनी राजा ठाकूर याच्या बँक खात्यात 15 सप्टेंबर 2020 रोजी आरटीजीएसद्वारे रक्कम पाठविली. त्यानंतर नोकरीकामी वेळोवेळी विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरूवात केली.
तसेच फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करत तुझ्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करीन, तुझ्या मुलाबाळांना जिवे ठार मारून टाकीन, अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर छजलाने यांनी भिंगार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.