
अहमदनगर- सावेडी उपनगरातील सराईत गुन्हेगार टिंग्या साळवेने आपल्या साथीदारांसह आणखी एक कृत्य केले आहे. त्याने हॉटेल व्यावसायिकाच्या मुलाला कोयत्याने मारहाण केली. त्याच्या गळ्यातील आठ तोळ्याची सोन्याची चैन व 15 हजाराची रक्कम चोरून नेली.
दरम्यान तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द गुन्हा दाखल होताच पोलिसांनी टिंग्याला अटक केली आहे. टिंग्या ऊर्फ सुमेध किशोर साळवे (वय 26, रा. निलक्रांती चौक) व तीन अनोळखी इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिंग्याच्या हल्ल्यात सिध्दार्थ संदीप बोरूडे (वय 18 रा. बोरूडे मळा, बालिकाश्रम रोड) हा युवक जखमी झाला आहे. त्याने पोलिसांत फिर्याद दिली आहे.
सिध्दार्थ व त्यांच्या हॉटेलवरील वॉचमन सोमवारी रात्री दुचाकीवरून जात असताना पावणे बारा वाजेच्या सुमारास निलक्रांती चौक येथे गुन्हेगार टिंग्याने सिध्दार्थ यांच्या गळ्यातील आठ तोळ्याची सोन्याची चेन ओढल्याने त्यांचा दुचाकीवरील तोल गेला. ते दुचाकी सोडून पळू लागले असता त्यांना कोयत्याने पाठीवर मारून जखमी केले.
तसेच टिंग्यासह इतर तिघांनी शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सिध्दार्थ यांच्या खिशातील 15 हजार रूपयांची रोख रक्कम बळजबरीने काढून घेतली आहे.